Ad will apear here
Next
हमसफर मेरे हमसफर...
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना आठ डिसेंबर २०२० रोजी ८५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’मध्ये आस्वाद घेऊ या धर्मेंद्र यांच्यावर चित्रित झालेल्या ‘हमसफर मेरे हमसफर’ या एका सुखद प्रेमगीताचा...
........
अमेरिकन ट्यूबवेल कंपनीत ‘तो’ फक्त ऐंशी रुपयांवर नोकरीला होता. त्याची कामातील आत्मीयता आणि मेहनत बघून तीन-चार दिवसांतच ‘त्याला’ सुपरवायझर म्हणून नेमण्यात आले. पगार ३०० रुपये झाला! काही महिन्यांनी ४५० रुपये ‘त्याला’ पगारापोटी मिळू लागले. तो काळ होता १९५४चा! त्या काळात एवढा पगार म्हणजे भरपूर होता; पण पहिल्यापासूनच ‘त्याच्या’ डोक्यात चित्रपटातील हिरो होण्याचे भूत शिरले होते. ते जात नव्हते. तो काम करत होता ती अमेरिकन कंपनी असल्यामुळे तेथे गबाळेपणा नव्हता. थाटामाटात राहावे लागे! 

त्यामुळेच पगारातील चार पैसे वाचवून मुंबईला जावे आणि फिल्म इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, हे त्याचे स्वप्न पैशाअभावी पुरे होऊ शकत नव्हते. तशातच एक दिवस फिल्मफेअर युनायटेड प्रोड्युसर यांनी मुंबईत आयोजित केलेली ‘टॅलेंट काँटेस्ट’ची जाहिरात ‘त्याच्या’ वाचनात आली. ‘त्याने’ ताबडतोब आपल्या फोटोसह फॉर्म भरून मुंबईला पाठवला. त्याला खूप दिवस होऊनही उत्तर आले नाही. ‘त्याने’ आशा सोडली आणि एक दिवस अचानक पत्र आले. इंटरव्ह्यू आणि टेस्टसाठी ‘त्याला’ मुंबईला बोलावले होते. हा गेला आणि तेथे त्याची टेस्ट चक्क गुरुदत्त आणि बिमल रॉय यांनी घेतली. त्यामध्ये ‘तो’ उत्तीर्ण झाला; पण पुढे काय?

दिवस पुढे जाऊ लागले. हॉटेलात राहायचे तर जवळचे पैसे संपत आलेले. ‘तो’ नातेवाईकांकडे गेला - पण तेथे किती दिवस राहणार? निर्मात्यांना भेटणे सुरू झाले. एस. मुखर्जी यांनी ‘लव्ह इन सिमला’ चित्रपटाकरिता त्याला बोलावले आणि चक्क घालवून दिले. एक शेराही मारला, ‘मला अॅक्टर हवा, फुटबॉल प्लेअर नको!’ सर्वत्र नकारघंटा घेऊन तो पंजाबात परत गेला. तेथे त्याची पत्नी होती, छोटा मुलगा होता. तेथे त्याला रेल्वेखात्यात क्लार्कची नोकरी मिळाली. हिंदी चित्रपट सृष्टी एका ‘ही मॅन’ला मुकली. 

...पण नियतीची तशी इच्छा नव्हती. ज्या ‘टेस्ट’मध्ये ‘हा’ उत्तीर्ण झाला होता, तेव्हा त्याच्याबरोबर एक तरुणीही निवडली गेली होती. तिचा भाऊ अर्जुन हिंगोरानी हा तेव्हा ‘याच्या’ व्यक्तिमत्त्वाने इतका प्रभावित झाला होता, की ‘जेव्हा आपण चित्रपट दिग्दर्शित करू तेव्हा यालाच हिरो करायचे,’ असा निश्चय त्याने केला होता. त्यामुळेच जेव्हा निर्माता टी. एन. बिहारी यांनी ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे काम अर्जुन हिंगोरानींवर सोपवले, तेव्हा हिंगोरानी ‘याला’ शोधू लागले. 

त्याच वेळी लुधियाना येथील निर्माते आर. के. नय्यर यांनी ‘याला’ पत्र लिहून आपल्या चित्रपटातील हिरोचा रोल देऊ केला. या गोष्टीस ‘त्याच्या’ वडिलांनी विरोध केला; पण त्याचे हरवंस नावाचे मामा त्याच्या पाठीशी उभे राहिले. काय व्हायचे ते होईल या विचाराने ‘हा’ परत मुंबईत आला. नय्यरनी याला नीटपणे निरखून पहिले व नकार दिला. आता तो मुंबईत ‘काही तरी करून दाखवतोच’ या विचाराने आल्याने तो ‘फिल्मफेअर’च्या संपादकांना पुन्हा जाऊन भेटला. ते त्याला त्याच्या शोधात असलेल्या अर्जुन हिंगोरानींकडे घेऊन गेले. 

अशा प्रकारे ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटाद्वारे ‘त्याचा’ हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला आणि पंजाबचा हा जाट, देओल घराणे प्रसिद्धीस नेणारा ‘धर्मेंद्र’ हिंदी चित्रपटाचा हिरो झाला. या पहिल्या चित्रपटानंतर लोकप्रिय होण्यासाठी धर्मेंद्रला वाट बघावी लागली. ओ. पी. रल्हनच्या ‘फूल और पत्थर’ चित्रपटाने मात्र शांत, सभ्य प्रियकराची कात टाकून धर्मेंद्र ‘मसल’ दाखवणारा पहिला बलदंड हिरो म्हणून परिचित झाला. 

स्टंट चित्रपटात त्या पूर्वी दारासिंग, रंधवा इत्यादी नटांनी आपले शरीर दाखवले होते; पण स्टंट चित्रपटांव्यतिरिक्त इतर चित्रपटांत शरीर दाखवणारा धर्मेंद्र हा पहिला हिरो होय! १९६० ते १९७० या कालावधीत विविध प्रकारच्या भूमिका करून १९७०नंतर सूडपटांच्या लाटेत आपल्या दणकट शरीरामुळे तो सर्वांत बिझी स्टार बनला. त्याच्या शरीराकडे बघून कथानके, प्रसंग, संवाद, भूमिका लिहिल्या जाऊ लागल्या! लोखंडी भाला, सळई वाकवणे, मोठे दगड उचलून फेकणे, चालती गाडी थांबवून धरणे, इतकेच काय, उडणारे हेलिकॉप्टर खाली खेचणे असे अनेक प्रसंग धर्मेंद्रकडून करवून घेतले जाऊ लागले. धर्मेंद्र त्या धारेत वाहत गेला. ‘कमीने, कुत्ते’ असे ओरडत व्हिलनच्या अंगावर धावून जाणारा धर्मेंद्र वारंवार दिसू लागला!

याच वेळी त्याचे वयही वाढत होते. ओघानेच त्याने वयपरत्वे मोठा भाऊ, डी. एस. पी. अशा भूमिका स्वीकारणे सुरू केले. ऐंशीच्या दशकातील मल्टिस्टारकास्ट चित्रपटांच्या लाटेतही तो टिकून होता. कारण हाणामारी व त्याला आवश्यक असणारे शरीर म्हणजे मजबूत धर्मेंद्र!

‘कुंवारा बाप’ चित्रपटात तर मेहमूद त्याच्या हाताकडे पाहून म्हणतो, ‘ये हाथ है या हथोडा?’ हातोड्यासारखी मजबूत शरीरसंपदा धर्मेंद्रने व्यायामाने मिळवली आहे. सध्याच्या नटांप्रमाणे इंजेक्शन घेऊन तात्पुरती मजबूत दिसणारी ती बॉडी नाही. धर्मेंद्रचा विषय निघाला, की काही चित्रपटप्रेमी नाक-डोळे मुरडतात; पण धर्मेंद्रचे चाहतेही तेवढेच नव्हेत, तर त्यांच्यापेक्षा जास्त आहेत आणि ते सर्व स्तरांतील आहेत. 

जिंद (हरियाणा) येथील सायकल दुरुस्त करणारा अर्जुन सिंग हा आपल्या दुकानात सकाळी धर्मेंद्रच्या अगणित फोटोंना ओवाळल्याशिवाय कामाला सुरुवात करत नाही. त्याने धर्मेंद्रला शंभर पत्रे लिहिली आहेत. ‘फूल और पत्थर’ त्याने ३५ वेळा पाहिलाय. सातारा न्यायालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी पोपट पवार धर्मेंद्रचा मोठा चाहता आहे. त्याने शोले ३०० वेळा, जुगनू ७५ वेळा, तर चरस, आझाद १०० वेळा पहिले आहेत. धर्मेंद्रचे अगणित फोटो, कात्रणे त्याने जमा केली आहेत. धर्मेंद्रची खडान् खडा माहिती त्याला आहे. त्याचे संवाद त्याला पाठ आहेत. 

अशा चाहत्यांचे प्रेम घेत धर्मेंद्रने आज वयाची ८५ वर्षे पूर्ण केली! आठ डिसेंबर १९३५ ही त्याची जन्मतारीख! ‘तेरी एक आसू के बूँद के लिए मैं खून की नदियाँ बहाऊंगा’ असे किंवा ‘बसंती इन कुत्तों के सामने मत नाच’ असे संवाद म्हणणाऱ्या धर्मेंद्रपेक्षा एक वेगळा धर्मेंद्र पाहायचा असेल, तर ‘मुझे दर्द दिल का पता न था’ अशी व्यथा गाणारा ‘आकाशदीप’मधील धर्मेंद्र पाहायला हवा! ‘बहारों ने मेरा चमन लूटकर’ गाणारा ‘देवर’मधील धर्मेंद्र पाहायला हवा! ‘सत्यकाम’सारखा चित्रपट तर धर्मेंद्र एक वेगळेच तत्त्ववादी, शांत रूप दाखवतो. माला सिन्हा व तनुजा या दोन नायिकांच्या कात्रीत सापडलेला धर्मेंद्र ‘बहारें फिर भी आयेगी’मध्ये वेगळाच भासतो. अनुपमा, शोला और शबनम, चंदन का पलना, पूर्णिमा हे चित्रपट म्हणजे शांत, आकर्षक व गोड दिसणाऱ्या धर्मेंद्रचे मनोहरी दर्शन देणारे होते. 

प्रमुख नायकाच्या अभिनयाचा फिल्मफेअर पुरस्कार एवढ्या दीर्घ काळात धर्मेंद्रला मिळाला नाही. परंतु १९९१मध्ये ‘घायल’ या त्याने निर्माण केलेल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. सनी देओल आणि बॉबी देओल ही धर्मेंद्रची मुले पडद्यावर आली. त्यांच्याकरिता त्याने चित्रपट निर्माण केले. विजेता फिल्म्स ही चित्रसंस्था त्याने स्थापन केली. सनीने चांगल्या प्रकारचे यश मिळवले. ‘अपने’ चित्रपटात हे पिता-पुत्र एकत्र आले होते. तो त्यांचा घरचा चित्रपट होता. धर्मेंद्रने काही वर्षांपूर्वी राजकारणातही प्रवेश केला होता. 

असा हा हिंदी चित्रपटाच्या ही-मॅनच्या कारकिर्दीचा धावता आढावा. हिंदी चित्रपटसृष्टीच्या तीन इंद्रांपैकी हा एक इंद्र! (दुसरे दोन म्हणजे राजेंद्र व जितेंद्र). इंद्र म्हटले म्हणजे अप्सरा आली; पण या इंद्राला अप्सराच नव्हे, तर रती, मेनका, रंभा यांच्यासारखे परिपूर्ण सौंदर्य असलेली ‘हेमा मालिनी’ लाभली! पडद्यावरच्या या जोडीला रसिकांनी पसंत केले. राजा रानी, शोले, प्रतिज्ञा, पत्थर और पायल, रझिया सुलतान, जुगनू अशा अनेक चित्रपटांतून ते एकत्र आले आणि केवळ पडद्यावर नव्हे, तर प्रत्यक्ष जीवनातही एकमेकांचे साथीदार बनून राहिले आहेत. 

अशा या धर्मेंद्रचे एक सुखद प्रेमगीत आपण पाहू या! चित्रपट १९६५चा ‘पूर्णिमा!’ धर्मेंद्रची या चित्रपटातील नायिका मीनाकुमारी! संगीत कल्याणजी-आनंदजी आणि गीतकार गुलजार! लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेले हे एक सुनहरे गीत! मीनाकुमारी आनंदी चेहऱ्याने आणि देखणा धर्मेंद्र बरोबर! 

या युगलगीताचे वेगळेपण असेही आहे, की संपूर्ण गीतातील अंतऱ्यातील ओळ नायक म्हणतो व एक ओळ नायिका म्हणते! अर्थात गीताची सुरुवात नायक करतो - 

मुकेश - हमसफर मेरे हमसफर पंख तुम परवाज हम 
जिंदगी का साज हो तुम साज की आवाज हम 

(हे माझ्या प्रिये) माझ्या सहचारिणी, तू माझे पंख आहेस आणि (माझे जीवन म्हणजे) त्या पंखांनी घेतलेली भरारी आहे. (तसेच) माझे जीवन म्हणजे एक वाद्य असून, त्याचा आवाज तू आहेस. (एवढे आपण प्रेमामध्ये एकरूप झालेले आहोत.) 

यानंतर नायकाचेच काही शब्द घेऊन नायिका त्याला म्हणते - 

लता - हमसफर मेरे हमसफर पंख तुम परवाज हम 
जिंदगी का गीत हो तुम गीत का अंदाज हम 

(हे प्रियकरा) पंख आणि त्या साह्याने घेतलेली भरारी हे जसे एकमेकांशी निगडित आहेत, तसेच आपण दोघे आहोत (पण त्याचबरोबर माझ्या) जीवनाचे गीत तू आहेस व त्या गीताचा अंदाज अर्थात ढंग, ढब मी आहे. (असेही आपण एकरूप आहेत.) 

गीताचा हा मुखडा झाल्यानंतर त्या दोघांच्यातील प्रेमसंवाद पुढे चालू होतो. गीताच्या पुढील दोन्ही अंतऱ्यात दोघेही एकेक ओळ गातात.

लता - आँख ने शरमा के कह दी दिल के शरमाने की बात 

(माझ्या) हृदयातील लज्जेची भावना माझ्या नेत्रांनी व्यक्त केली, असे ती म्हणताच, तो म्हणतो -

मुकेश - एक दिवाने ने सुन ली दुजे दिवाने की बात 

एका प्रेमदिवाण्याने दुसऱ्या प्रेमदिवाण्याच्या गोष्टी ऐकल्या, म्हणणे ऐकले. 

यावर ‘ती’ म्हणते -

लता - प्यार की तुम इंतहा हो प्यार का आगाज हम 

(माझ्या) प्रीतीची सुरुवात माझ्यापासून होते व शेवट तुझ्यापाशी होतो.

दोन प्रेमी जिवांचा संवाद असा पहिल्या अंतऱ्यात संपल्यावर संगीतकार पुढील अंतऱ्याच्या आधी कर्णमधुर संगीताच्या तुकड्याची योजना करतो आणि मग दुसरा अंतरा सुरू होतो -

मुकेश - जिक्र हो अब आसमान का, या जमीन की बात हो 
लता - खत्म होती है तुम्ही पर अब कही की बात हो 
मुकेश - हो हसीन तुम, महजबीं तुम, नाजनी तुम नाज हो

(हे प्रिये) आता जेव्हा आकाशाचा उल्लेख होईल अगर जमिनीबद्दल गोष्टी होतील तेव्हा (ती लगेच म्हणते) कुठलीही गोष्ट असू दे, आता तुझ्या उल्लेखानेच, तुझ्या समावेशानेच ती पूर्ण होईल. (आपल्याबद्दलचे हे उद्गार ऐकल्यावर ‘तो’ म्हणतो) हे सुंदरी, चंद्रासारखा भालप्रदेश असलेल्या (महजबीं) हे सौंदर्यवती तुझी ऐट, नखरा (नाज) (सारे मला प्रिय आहे.)

दोनच कडव्यांचे हे मधुर गीत धर्मेंद्रचे संयमी प्रियकराचे रूप दाखवते व श्रवणाचा ‘सुनहरा’ आनंदही देते. धर्मेंद्र यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
 
- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZVTCH
Similar Posts
तेरे बिना जिंदगी से कोई ‘अष्टपैलू’ हे विशेषणही कमी पडेल, इतके पैलू असलेला अभिनेता संजीव कुमार याचा सहा नोव्हेंबर हा स्मृतिदिन. त्यानिमित्त ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या त्याच्यावर चित्रित झालेले ‘तेरे बिना जिंदगी से कोई...’ हे गीत...
दिवाळीच्या आठवणी जागवणारी चित्रपटगीते ‘सुनहरे गीत’ या सदरात दर वेळी आपण एखाद्या कलावंताबद्दलची माहिती घेऊन त्याच्या एखाद्या गीताचा आस्वाद घेतो. आजचा लेख मात्र वेगळा आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सदरलेखक पद्माकर पाठकजी यांनी स्मरणरंजनपर लेख लिहिला आहे. त्यांच्या लहानपणी किंवा तरुणपणात दिवाळीच्या काळात रेडिओवर ऐकल्या जाणाऱ्या ‘सुनहऱ्या’ चित्रपटगीतांच्या
सीने में सुलगते है अरमाँ... प्रेम धवन हे जुन्या काळातील एक प्रतिभासंपन्न गीतकार! अनेक चित्रपटांसाठी आशयसंपन्न गीते लिहिलेल्या या गीतकाराचा १३ जून हा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या प्रेम धवन यांनी लिहिलेल्या ‘सीने में सुलगते है अरमाँ...’ या गीताचा...
छोड दे सारी दुनिया... चित्रपटप्रेमींच्या आजही स्मरणात असलेल्या अभिनेत्री नूतन यांचा चार जून हा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आस्वाद घेऊ या नूतन यांच्यावर चित्रित झालेल्या ‘छोड दे सारी दुनिया’ या गीताचा...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language